नाना फडणवीस- एक बुद्धिमान मराठा

     द लॉस्ट हिरोज सादर करत आहेत, एकेकाळी २/३ भारतवर्षावर पसरलेल्या बलशाली मराठा साम्राज्यात होऊन गेलेल्या, पेशवाईतील साडेतीन पैकी अर्धे शहाणे म्हणून ओळख असणाऱ्या मुत्सद्दी, बुद्धिमान नेत्याची कहाणी...

नाना फडणवीस : एक बुद्धिमान मराठा


 'महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले,

मराठ्यांविना राष्ट्रगाडा न चाले,

खरा वीर वैरी पराधीनतेचा,

महाराष्ट्र आधार या भारताचा!'

     - सेनापती बापटांनी लिहिलेल्या या ओळी महाराष्ट्राच्या स्वभावाला अत्यंत चपखल लागू पडतात. महाराष्ट्राच्या भूमीने आजवर अनेक वीर, कलाकार, समाजसुधारक, साहित्यिक आणि मुत्सद्दी व्यक्तींना जन्म दिलेला आहे. यापैकी सर्वांनीच भारताच्या सर्वांगीण विकासाच्या कामात आपला सिंहाचा वाटा उचलला यात संशय नाही. सर्वांची नावे विस्तारभयास्तव देता येणे कठीण आहे पण महाराष्ट्रातील अनेक नावं आपल्या डोळ्यासमोर आता येत असतील. पण असे असूनही आपल्या मुत्सद्देगिरीने ओळखला जावा असा व्यक्ती निराळाच डोळ्यासमोर येतो... साधारणपणे, पेशव्यांच्या कालखंडात 'नाना फडणवीस' नावाच्या व्यक्तीने आपल्या बुद्धीचातुर्य, मुत्सद्दीपणा, दूरदृष्टी याच्या बळावर तो मान कमावला आहे. दुर्दैवाने, आजही हे चरित्र तितकंसं उजेडात नाही. अनेकांना नाना फडणवीस कोण हे माहीत असेलच असंही नाही. त्यामुळे, नानांचं चरित्र तसं अल्पश्रुत आहे. नानांबद्दल लिहिताना ग्रँट डफ त्यांना "मराठी राष्ट्राने दिलेला अत्यंत बुद्धिमान पुरुष" असं म्हणतो. या फडणवीस घराण्याचा पूर्व तपशील असा आहे-

जॉन थॉमस सेटोन यांनी काढलेले नाना यांचे छायाचित्र

        

   रत्नागिरी जिल्ह्यातील वेळास हे श्रीवर्धनच्या दक्षिणेला असलेले गाव भानु घराण्याचे मुळ गाव होते. भट घराण्यातील पहिले पेशवे बाळाजी विश्वनाथ व हरी महादेव भानू यांचा चांगला स्नेह असे. भट घराण्यातील पुरुषांनी नोकरीचाकरीत भाग्य आजमावून पाहावे म्हणून कोकण सोडण्याचा निश्चय केला तेव्हा भानु कुटुंबातील हरी महादेव हे बाळाजी विश्वनाथ यांच्यासमवेत जे काही मिळेल ते मिळून खाऊ असे ठरवून घाटमाथ्यावर आले. पुढच्या काळात बाळाजी विश्वनाथ यांच्या भाग्याचा जोरदार उदय झाला व त्यांस शके १६३५ (इसवी सन १७१४) मध्ये पेशवाईची वस्त्रे शाहु राजांनी दिली. त्याच वेळी राज्याची फडनिशी बाळाजींनी मागून घेतली व भानु कुटुंबाला देऊ केली आणि भानु कुटुंब फडणवीस झाले. याच कुटुंबात पुढे चालून जनार्दन फडणवीस आणि रखुमाई (बळवंतराव मेहेंदळे यांच्या भगिनी) यांच्या पोटी दुर्मती संवत्सर, माघ कृ चतुर्थीला शुक्रवारी दि १२ फेब्रुवारी १७४२ ला सातारा मुक्कामी बाळाजी जनार्दन फडणवीस (नाना) यांचा जन्म झाला. त्यावेळी मराठा राज्याचे पेशवे श्रीमंत बाळाजी बाजीराव (नानासाहेब) होते. 

     नानांना लहानपणीपासून भाऊसाहेब (सदाशिवराव भाऊ) पेशवे यांनी शिक्षण द्यायला सुरुवात केली होती. माधवराव, विश्वासराव यांच्यासोबत नाना देखील लिखाण, व्यवहार, युद्ध या सर्वांचे शिक्षण घेत होते. सुरुवातीपासून नानांना व्यायामात कमी आवड असे, पण दरबाराच्या हिशेबाच्या कामात, व्यवहारात नानांनी चांगली प्रगती केली होती. नानांचे वडील श्रीमंतांबरोबर एका मोहिमेवर अचानक आजारी पडून कैलासवासी जाहले; आणि वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी दौलतीच्या फडनिशीची वस्त्रे नानांना दिली गेली.( २९ नोव्हेंबर १७५६- मार्गशीर्ष शु. अष्टमी). नाना चौदाव्या वर्षी फडणवीस झाले. त्यापूर्वीच वय वर्ष १० असताना पुण्यातील यशोदाबाई गद्रे यांच्याशी नानांचा विवाह झाला होता.

      फडनिशी मिळाल्यानंतर अवघ्या ४ वर्षात महाराष्ट्रावर अब्दालीचे अरिष्ट कोसळले. पानिपतावर लढताना कैक मराठे धारातीर्थी पडले. फडणीस या नात्याने नानादेखील पानिपतावर गेलेले होते. युद्धापूर्वी मथुरा, गोकुळ, वृंदावन येथील दर्शने नानांनी केली. खासे भाऊसाहेब लढत असेपर्यंत नाना मैदानावर हजर होते. भाऊसाहेब पडल्यानंतर मराठा सैन्याची पीछेहाट सुरू झाली. नाना आपला जीव वाचवून कसेंबसे बऱ्हाणपूर येथे पोहचले. तेथेच त्यांची व श्रीमंतांची भेट झाली. पानिपतावर झालेला विध्वंस ऐकून श्रीमंतांचे मन विषण्ण झाले, त्याच धक्क्यातुन सावरू न शकल्याने प्रकृती दिवसेंदिवस खालावत गेली आणि पुणे मुक्कामी श्रीमंतांनी कैलासवास केला. त्यानंतर, १७ वर्षांच्या माधवरावांना पेशवाई दिली तर १९ वर्षाचे नाना फडनिशी सांभाळत होते. पेशवा दरबारी नानांच्या कारभाराला याच काळात महत्व प्राप्त होत गेले. माधवराव अनेकदा अनेक मोहिमांवर जात तेव्हा नाना त्यांच्या माघारी जवळपास सर्व राज्यव्यवस्था सांभाळत असत. महसूल वसुली करण्यापासून तर राघोबांना नजरकैदेत ठेवल्यावर त्यांच्या बंदोबस्ताचे कामदेखील माधवरावांनी नानांना सांगितले होते. वयाची २० वर्षेही पूर्ण न झालेले नाना ही सगळी कामे बिनदिक्कत, बिनबोभाट, चतुराई व हुशारीने सांभाळत असत. याच काळात नानांच्या हुशारीची एक कथा सांगितली जाते ती अशी-  शनिवारवाड्याचे सर्व जमा खर्च बघताना रमाबाईच्या खर्चात विड्याच्या पानांवर खर्च होत असल्याचे नानांना ध्यानात आले. नानांनी "श्रीमंत मोहिमेवर गेले असता आपण विडा खाण्याचे प्रयोजन नाही" असे रमाबाईंना स्पष्टपणे सांगितले. 

    अशा पद्धतीने नाना आपल्या कामात कुठलीही भीड बाळगत नसत. याच काळात नानांनी शिंद्यांच्या गादीवर महादजीचा हक्क असल्याचे माधवरावांना पटवून दिले, आणि तो वाद अतिशय चतुराईने सोडवून दाखवला. महादजीचा हक्क माधवरावांनी पण मान्य केला. आतड्याच्या क्षयरोगाने माधवराव थेऊर मुक्कामी वयाच्या २८ व्या वर्षी कैलासवासी झाले. फडनिशी अद्यापही नानांकडे होती. लहानग्या नारायणरावाच्या नावाने साताऱ्याहुन पेशवाईची वस्त्रे आली. नारायणराव आधीपासूनच आपल्या मातोश्रीच्या सल्ल्याने वागणूक ठेऊन असायचे. बऱ्याचदा आपल्या ज्येष्ठ कारभारी व दरबारी मंडळींना फटकन बोलून जाणे, वगैरे प्रकार नारायणराव करत असत. एकीकडे आनंदीबाई राघोबांना पेशवेपद हाती घेण्याविषयी सांगत असे, दुसरीकडे नारायणराव आपल्या आईच्या सल्ल्याने चालत. या सगळ्यात कारभाराकडे दुर्लक्ष सुरू झाल्याने नानांची अस्वस्थता वाढत गेली; त्यातच मराठा राजकारणात इंग्रजांचा शिरकाव होईल अशी शक्यता वाटू लागली. माधवराव असताना अनेकदा साष्टी आणि वसई प्रांतासाठी इंग्रजांनी बोलणी लावली होती, पण मुत्सद्दी माधवराव आणि नानांनी त्यांना दाद लागू दिली नव्हती. आता पुन्हा तसे होऊ नये म्हणून नानांनी विशेष लक्ष पुरवले. 

      नारायणरावाचे वागणे मात्र फारच खटकत होते, कळस म्हणजे नारायणरावांनी आईच्या सांगण्यावरून राघोबाला अटकेत टाकण्यापर्यंत मजल मारली. बऱ्याचदा नानांच्या सांगण्याकडे नारायणराव कानाडोळा करू लागले. कैदेत असलेल्या राघोबाने अखेर सुमेरसिंहा च्या मदतीने ३० ऑगस्ट १७७३ ला भर दिवसा पेशव्याची हत्या घडवून आणली. याबाबत नानांची एक कथा अशी सांगितली जाते की- एकदा नारायणराव पर्वतीवर दर्शनाला आले असता खेळायची लहर आली म्हणून नानांच्या डोक्यावरचे पागोटे उडवून लावले, आणि नानांना म्हणले, "बघा तुमचे पागोटे सांभाळा,"  त्यावर नाना उत्तरले, "माझे पागोटे पडले यात नवल नाही, आपण आपला मुकुट सांभाळा." यावरून नानांनी नारायणरावांना आपले जीवित सांभाळण्याचा सांकेतिक सल्ला दिला होता. पण नारायणरावांना तो समजला नाही. 

सवाई माधवराव (दुसरे) पेशवे यांच्यासमवेत नाना फडणवीस


         वरील सर्व प्रकारांना कंटाळून नाना, सखारामबापू यांनी पुरंदरे, विंचूरकर आदी मंडळींना सहकारी बनवून राघोबाच्या पेशवापदाला अधिकार मान्य केला नाही आणि सर्वांनी मिळून राज्य चालवायचे नक्की केले. याची 'बारभाई कारस्थान' अशी नोंद आढळते. त्याच वेळी नारायणरावांची पत्नी (गंगाबाई) गरोदर होती तिला किल्ले पुरंदर इथे नेऊन ठेवले. गंगाबाईला अपत्य होईपर्यंत बारभाई कारस्थान सुरू होते. अखेरीस १८ एप्रिल १७७४ रोजी गंगाबाईस पुत्र होऊन त्याचे नामकरण माधवराव (सवाई माधवराव) असे केले आणि वयाच्या ४० व्या दिवशी त्याला पेशवाईची वस्त्रे दिली. एकीकडे राघोबांनी इंग्रजांच्या बाजूने जायचा निर्णय घेतला, शेवटी पेशव्यांनी फौजा पाठवून राघोबाला पळता भुई थोडी केली आणि राघोबा सुरतेस पळून गेला. या सर्व घडामोडी घडत असताना पूर्णवेळ बारभाई राज्यात व्यवस्था सुनिश्चित राहावी, अडचणी येऊ नयेत, यासाठी नानांनी मोठे योगदान दिले त्याचबरोबर पुढील काळात एकीकडे इंग्रज आणि दुसरीकडे हैदर अली यांच्याशी एकाच वेळी संधान आणि एकाच वेळी युद्ध अशा सर्व आघाड्या अत्यंत चतुराईने नानांनी सांभाळल्या. फक्त सांभाळल्या असेच नाही तर सर्वांना खऱ्या अर्थाने न्याय दिला. नानांनी टिपू सुलतानाला सुद्धा मान वर काढायची फार संधी दिली नाही. पुढील काळात १७९८ साली नानांना विश्वासघात करून आपल्याच व्यक्तींकडून अटक करण्यात आली आणि नगरच्या किल्ल्यात डांबून ठेवले. दौलतराव शिंदे यांच्या प्रयत्नानंतर त्यांची लगेच मुक्तता पण झाली पण एकूण राजकारणाला लागलेले वळण, इंग्रजांचा होत असलेला राजकारणातला प्रवेश व आपल्याशी झालेला असा विश्वासघात या सर्व बाबींमुळे नानांचे मन खिन्न झाले आणि दि १३ मार्च १८०० रोजी नानांचे  दुःखद निधन झाले. 

      मराठ्यांच्या राजकीय इतिहासात अनेक व्यक्ती होऊन गेले पण मुत्सद्देगिरी, बुध्दीचातुर्य म्हणले की नानांचे नाव निःसंशय पुढे येते. नानांना पेशवाईतील 'साडेतीन शहाण्यांपैकी अर्धे शहाणे' असेही म्हणले गेले आहे. प्रस्तुत लेखात नानांची कारकीर्द फारच संक्षेपाने मांडली आहे, ही केवळ चरित्राची ओळख आहे. बरेच महत्वाचे मुद्दे यात बाकी आहेत. नानांचे हैदर अली प्रकरणातील योगदान, टिपू सुलतान प्रकरण यासाठी इच्छुकांनी य. न. देवधर व व्ही. व्ही. खरे यांनी लिहिलेले नाना फडणीसांचे चरित्र मुळातून वाचावे.

।।भारत माता की जय।।


लेखन श्री शुभम क्षीरसागर, संभाजीनगर व संकलन टीम द लॉस्ट हिरोज द्वारे

संदर्भ- वरील माहितीचे संदर्भ Nana Fadnavis- the external affairs of Maratha Empire - Y. N. Deodhar, नाना फडणवीस यांचे चरित्र- श्री व्ही. व्ही. खरे येथून घेतलेले असून माहितीची सत्यता पडताळणी केलेली असून माहिती खात्रीशीर आहे. कोणतीही अडचण वा तक्रार नोंदवण्यासाठी thelostheros21@gmail.com वर संपर्क करावा.

लेखकाचा संपर्क   kshirsagarshubham7795@gmail.com

आपले अभिप्राय देखील जरूर कळवावे.
     
    या माहितीचा आमच्याकडे कुठलाही copyright नसून या थोर व्यक्तींची माहिती सर्व समाजापर्यंत पोहोचावी एवढाच आमचा उद्देश आहे; तरी माहिती पुढे पाठवताना फक्त द लॉस्ट हीरोस या नावासहित पाठवावे ही नम्र विनंती.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

योगीराज श्री कल्याण स्वामी

योगीराज श्री कल्याण स्वामी

म्लेंच्छ संहारक: লা-চিত, कथा रक्तरंजित योध्याची