म्लेंच्छ संहारक: লা-চিত, कथा रक्तरंजित योध्याची

 भाग- २

"म्लेंच्छ संहारक: লা-চিত"
                          - कथा रक्तरंजित शौर्याची
     गोहोटी (आजची गुवाहाटी) येथे सैन्याची पहिली धडक होणार असल्याने शत्रुसैन्यास नामोहरम करण्यासाठी सुयोग्य सेनापतीची निवड होणे गरजेचे होते. सैन्याची निष्ठा, धैर्य कायम ठेऊन स्वतः धैर्य , शौर्य व नेतृत्वाने लढेल अशा आवश्यक त्या गुणांवर चर्चा होऊन अखेर लाचीत यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. पुढील दिवशी दरबारी लाचीत यांना बोलावले असता , राजासमोर त्यांनी गुडघे टेकवून मुजरा केला; तोच एका रक्षकाने त्यांचे शिरस्त्राण पळविले. क्रोध अनावर झालेल्या लाचीतने त्याचा पाठलाग करून पकडले व त्याचा शिरच्छेद करणार इतक्यात राजाने विचारले असता, "माझा शिरपेच पळवून त्याने माझा अपमान केला आहे व कोणताही जातिवंत योद्धा असा अपमान सहन करणार नाही" असं म्हणताच राजांनी आपण तुझी परीक्षा पाहत असल्याचे सांगितले. राजसम्मान प्राणापेक्षाही श्रेष्ठ मानणाराच सेनेचे नेतृत्व उत्कृष्ट प्रकारे करू शकतो. लाचित कसोटीत पूर्ण उतरला होता, आपल्या राज्याचा झालेला अपमान धुवून काढण्यासाठी हा सर्वथा योग्य आहे असे राजाने सांगून लाचित यांस गोहोटीच्या दिशेने रवाना केले.
       दूताचा संदेश ऐकून तळपायाची आग मस्तकात गेलेल्या औरंगजेबाने अहोम राजाला धडा शिकवण्याचे ठरवले. मधील काळात छत्रपती शिवाजी महाराज मोठ्या शिताफिने आग्र्यातून औरंगजेबाच्या हाती तुरी देऊन गेले होते, यात मिर्झाराजा जयसिंह आणि पुत्र रामसिंहाचा हात असल्याचा संशय होता. असममधील प्रतिकूल हवामानामुळे स्वारीला गेलेला कदाचीतच परत येत असल्याने असामी लोक जादुटोना वगैरे करतात, अशा अफवा पसरवण्यात आल्या होत्या. औरंगजेब महा कपटी आणि धूर्त असल्याने त्याने रामसिंहाची असम स्वारीसाठी  नियुक्ती केली. रामसिंह मारला गेला तर काफ़िराला योग्य शासन होईल आणि जिंकला तर असामी लोकांना धडा शिकवला जाईल, असा त्याचा हेतू. रामसिंहाला हा हेतू ज्ञात होताचं तरी; त्याने स्वारीवर जाण्याचे एका अटीवर मान्य केले. असामी लोक जादूटोना करतात अशी खोटी गोष्ट दरबारी सांगून सोबत दैवी शक्तीने  सिद्ध असलेला साधू  द्यावा, ही ती अट. शिखांचे नववे गुरु श्री तेगबहाद्दूर जी यांच्यावर औरंगजेबाची नामर्जी असल्याने त्यांना सोबत नेण्याचे रामसिंहाने ठरवले. त्र्येसष्ठ हजार पायदळ, प्रचंड तोफा व घोडदळ घेऊन रामसिंह प्रथम ढाक्याच्या नवाबाकडे गेला. त्याच्या मदतीने ढाका चे व दिल्लीचे मिळून सुमारे तीन लक्ष सैन्य, सैन्याधिकारी, तोफखाना, घोडदळ असा विशाल मानवी महासागर रामसिंह नावाच्या एका हिंदूच्या नेतृत्वात गोहोटिच्या दिशेने दुसऱ्या हिंदू राजाला गिळंकृत करण्यास, एका म्लेंच्छा  (परकीय) च्या सांगण्यावरून मजल दर मजल करीत जात होता.   लाचित यांना, एक हिंदू जो परकीयांच्या सांगण्यावरून स्वकीयांशी लढण्यासाठी येत होता, त्याच्याशी मातृभूमीच्या रक्षणार्थ लढण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता, हेच मोठे दुर्दैव..!!!
      राष्ट्रीय रक्षा अकॅडमी (NDA) मधील लाचीत यांचा पुतळा
     Image source: wikimedia commons

        बडफुकान (सेनापती) झालेल्या लाचितच्या नेतृत्वात अहोम सेनेने ब्रम्हपुत्रनदी पार करुन सराईघाटाच्या पलिकडे लहान मोठे किल्ले व प्रदेश ताब्यात घेत चाल केली. इटाकुली या ठिकाणी मोगल सरदार फिरोजखानाची छावणी होती, अहोम सैन्य येत असल्याची वार्ता कळताच त्याने जोरदार तयारी केली. जसे जसे लाचित चे सैन्य युध्दास येत होते तसा फिरोजखानाने एकाएकी तोफांचा जोरदार मारा चढवला. तोफा बंद केल्याशिवाय इटाकुली जिंकने स्वप्नवत भासत असताना, सुचलेल्या एका युक्तीने गुप्तचरांची दोन गटात वाटणी करून दोन्ही गटांना भिन्न दिशांना पाठवुन ती अमलात आणायचे ठरले. झाले असे, की मध्य रात्री एकाएकी गोळीबाराचा आवाज ऐकुन मोगलांची त्रेधा तिरपीट उडाली, सर्व आवाजाच्या दिशेने गेले असता याच संधीची वाट पाहणाऱ्या अहोम गुप्तचरांनी मुघलांच्या तोफा पाण्याने भरुन पळ काढला.
       प्रातःकाळी लाचित ने किल्ल्यावर हल्ला चढवला,परंतु एकही तोफ चालत नसल्याने मोगलांची फजिती होऊन त्यांना पळताभुई थोडी झाली! या विजयाने राजाला देखिल आनंद झाला. तिकडे रामसिंहाच्या सेनेने पश्चिम असमात धुबडी येथे तळ ठोकला, गुरु तेगबहाद्दुर यांनी तेथे गुरुद्वारा स्थापून युध्द न होता समेट घडवुन आणण्यासाठी केलेले प्रयत्न असफल राहिले. गोहोटीच्या पंधरा मैलांवर हाजी येथे रामसिंहाने पुजा करुन युध्दाची योजना आखली. परंतु निसर्गापुढे कोणाचे चालते?!पावसाळ्याची चाहुल लागली व मलेरिया सहीत इतर साथीच्या रोगांनी पाय पसरावयास सुरुवात केली. मोगलांचे एक एक बळी पडत होते. लाचित मात्र गोहोटीच्या संरक्षणावर लक्ष देऊन पुढील योजना आखत होता...
          सैन्यामध्ये लढणाऱ्यांचे जेवढे महत्त्व असते तेवढेच किंवा त्याहुन अधिक गुप्तचर यंत्रणेचे असते. ज्याचे गुप्तचर बलाढ्य त्यास पराभुत करने कोणासही सहज शक्य होत नाही. लाचित यांच्या सेनेचे गुप्तचर हे देखिल चांगलेच बळकट होते. लाचित यांनी आपल्या काही विश्वासू लोकांना शत्रू छावणीत पाठवून तेथुन गुप्तमाहिती जमा करण्याच्या कामास लावले; फकिरांच्या वेशात गेलेल्या त्या साथीदारांनी अहोम सैन्या विषयी मोगलांमध्ये विविध अफवा पसरविण्याचे काम देखिल सुरेख रित्या केले,अहोम लोकांना दैवी वरदान लाभलेले आहे, ते जादुटोना करुन कच्च्या नरमांसाचे देखिल भक्षण करतात अशा खोट्या अफवा पसरवुन मोगलांची भितीने गाळन उडवली. लाचित यांनी पन्नास एक लोकांच्या हातात तंगड्या देऊन अग्नी भोवती नाचत असल्याचे नाटक तयार करुन सत्य पाहण्यासाठी आलेल्या मोगलांना दाखवले. काळोख्या रात्री ठिकठिकाणी राहुट्या पेटविणे तसेच केळीच्या खांबांना आग लावुन नदीत सोडुन देणे अशा विविध क्लुप्त्यांच्या सहाय्याने मोगलांना अहोम सैन्य प्रचंड मोठे असुन रोज संचलन करत असल्याचे भासवून त्यांचे खच्चीकरण केले. मोगल सेना भीतीने गळीतगात्र झाली! असेच एकदा संरक्षणासाठी उभारलेल्या तटबंदीचा काही भाग ढासाळल्याचे लक्षात आल्याने लाचित यांनी उशीर न करता आपल्या मामाच्या नेतृत्वात रात्रीतून दुरुस्तीसाठी काही लोकांना पाठवले. सकाळी किती काम झाले हे पाहण्यासाठी आलेल्या लाचित ने काम अर्धवट ठेवुन सर्व झोपल्याचे पहाताच क्रोध अनावर  होवुन मामास जाब विचारला. पण काही उत्तर देण्यापुर्वीच क्षणार्धात मामाचे मस्तक त्यांनी धडावेगळे केले.. "দেশ তাকে মামাই ডাঙৰ ন হয়" (देशतकै मामाई डांगर न होय) अर्थात देशापेक्षा मामा मोठा नसतो, या त्यांनी उद्गारलेल्या वाक्यातून देशा प्रती त्यांची निष्ठा दिसुन येते. दिवसा मागून दिवस व महिने लोटत होते परंतु रामसिंहाची सेना पुढे सरकु शकत नव्हती. अखेर कुटनीतीचा वापर करुन लाचित व त्याच्या सैन्याधिकाऱ्यांना लाच देवुन वश करण्याचे धुर्त प्रयत्न त्याने केले, पण ते असफल ठरल्याने रामसिंहाने अत्यंत घाणेरडी युक्ती लढवून लाचित ने लाच स्विकारल्याचे खोटे पत्र अहोम राजास पाठवले. बराच काळ लोटुनही ठोस असे काहीच हाती न लागल्याने राजाही चिंतेत होता; परंतु लाचित यावर त्यांचा पुर्ण विश्वास होता म्हणुन राजाने विवेके कार्य करावे असेच मत मुख्यमंत्री अतन बडगोहाई यांचे देखिल होते. त्याच काळात राजास रामसिंहाचे खोटे पत्र मिळाल्याने संतप्त राजाने लाचीत यांस जाब विचारण्याचे ठरविले. परंतु मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्याने 'हे बडफुकान, शत्रू सैन्याचा नाश करण्यासाठी पाठवण्यात आलेल्या तुझ कडून कार्य अजुनही पुर्णत्वास गेलेले नाही. तुस मोगलांचे भय वाटते का? माझी तुला आज्ञा आहे की तु ताबडतोब त्यांचा नाश कर अन्यथा मेखला धारण करुन आत्महत्या कर' असे पत्र पाठवले.
      Image source: wikimedia commons
 
    पत्र वाचताच लाचित चे मन अत्यंत व्याकूळ झाले, राजआज्ञेचे पालन करणे हे आद्य कर्तव्य आहे याची पुर्णपणे लाचितला जाण होतीच. देशापुढे मामासही न माननारा लाचित जो एक उत्कट देशभक्त होता; मातृभुमी साठी जो सर्वस्व त्यागुन आलेला होता, तोच आज खिन्न होता. पुढील दिवशी निवडक वीस हजार सैन्य घेउन त्यांचे दोन गट पाडून पाच हजार सैन्याची एक तुकडी पुढे गेली असता, ऐवढ्याश्या सैन्याचा आपण सहजच फडशा पाडू या विचाराने मोगल सैन्य आनंदीत झाले. लढाई मध्यावर आली असता आपल्या अजूबाजूस प्रचंड प्रमाणावर सैन्य असल्याचे मोगलांना दिसले, घनघोर युध्द चालले. लाचित च्या विजयाची चिन्हे दिसत होती मोगलांची हार दिसु लागताच रामसिंहाने आपले घोडदळ उतरवले. मोगल घोडदळ व अहोम पायदळ जे युध्द नीतीस धरुन नव्हते; परंतु नीतीयुध्द करतील ते मोगलच कसले ? रामसिंहास आपल्या अंबरच्या घोडेस्वारांवर प्रचंड विश्वास होता. इंद्र ही त्यांच्याशी युध्द करु शकणार नाही अशी त्याची दृढ आशा होती, मग त्यापुढे बिचाऱ्या असमींचा काय निभाव लागणार होता? लाचित चे दहा हजार शुर त्या युध्दात धारातीर्थी पडले. सर्वत्र दुःखाचे सावट पसरले. ''केवळ राज आज्ञेचे पालन करण्यासाठी मला माझ्या दहा हजार वीरांचे बलिदान द्यावे लागले. केवढा हा दारुण पराभव! ते वीर माझे राष्ट्राचे आधार स्तंभ होते'' असे उद्गार लाचितच्या मुखातुन बाहेर पडले, परंतु उसने अवसान आणुन सर्वांनी राष्ट्र रक्षणाची पुनः प्रतिज्ञा केली.
       आलाबोई येथे झालेल्या संग्रामात रामसिंहाला एवढा विजय मिळूनही गुवाहटी त्यासाठी अजुन दुरच होती, सर्वथा अजिंक्यच होती. युध्दास आता चार वर्ष लोटली होती, राजा चक्रध्वजसिंहा देखिल अकस्मात स्वर्गस्थ झाले व मागून उदयादित्यसिंह गादीवर बसले. राजास दिलेले वचन आपण पुर्ण करु शकलो नाही याचे लाचित यास अतोनात दुःख झाले. सततचे शारिरीक व मानसिक श्रम यामुळे व्हावयाचा तो परिणाम झालाच! लाचित आजारी पडले. ज्वर अत्यंत वाढून तांदुळाचा दाना ठेवला तर त्याची तात्काळ लाही फुटावी या स्थितीस पोहोचला. इतिहासात याची
'अखोई फुटा ज्वर ' अशी नोंद आढळते. परंतु, 'देव तारी त्यास कोण मारी...?'
         विजयासाठी मुगलांना सराईघाटात आणणे आवश्यक होते. लाचित च्या आजार पणाची बातमी कळताच रामसिंहाने जलमार्गाने आगे कुच केले. हे कळताच भयंकर तापातही लाचित ने आपणास युध्द स्थानावर नेण्यास  सांगितले. समोरुन मोगलांच्या असंख्य युध्द नौका येताना दिसत होत्या; लाचित ने नौदलास सज्ज तेचा आदेश दिला. त्याकाळी मुहुर्त पाहुन आक्रमणे केली जात असत. ज्या मुहुर्तावर प्रभु श्रीरामचंद्रांनी रावणावर आक्रमण केले तोच मुहुर्त आता मोगलांचा काळ ठरणार होता. तो दिवस होता विजयादशमी इ.स.१६७४ चा...
बडफूकनने युद्ध सुरू करण्याचा सैन्याला आदेश दिला. पण मोगलांचा प्रतिहल्ला इतका भयंकर होता की अहोम सैन्य त्यापुढे दुर्बल ठरू लागले. रामसिंहाच्या नौदलाकडून होणारी कत्तल चुकविण्यासाठी लाचितच्या सैन्याने विरुद्ध दिशेने आपल्या युद्धनौका वळविण्यास सुरुवात केली. सैनिकांत एकच गोंधळ माजला. लाचितच्या युद्धनौकेतील नावाड्यांनेही आपल्या नौका विरुद्ध दिशेस वल्हविण्यास सुरुवात केली. लाचितने जेव्हा हे पाहिले, तेव्हा आधीच आजारी असलेले लाचित अतिशय संतापले. त्यांनी स्वतःच आपल्या नावेतील सैनिकांना ब्रह्मपुत्र नदीत ढकलून दिले. आता त्या युद्धनौकेत आजारी स्थितीत कसाबसा उभा राहिलेला लाचित एकटाच होता. जिच्या सुकाणूवर कोणीही नाही अशी युद्धनौका मोगल नौदलाच्या दिशेने वाहत येत असताना दिसत होती. किती विलक्षण ते दृश्य ! तशाही स्थितीत लाचित सैनिकांना ओरडून म्हणत होता ‘‘भ्याडांनो जा, खुशाल पळून जा आणि आपल्या कुटुंबियांसमवेत सुखाने नांदा! मात्र स्वर्गदेव राजाला सांगा "লাচিত জীয়াই থকা মানে গোহাটী এৰা নাই" (लाचीत जियाई थका माने गोहोटी इरा नाई) अर्थात लाचीतिने जीव गमावला परंतु गोहोटीत शत्रूस प्रवेश करू दिला नाही. लचितच्या या बोलण्याने शर्मिंदा झाल्याने सैनिक परत फिरले, त्यांच्यात स्फुरण चढले. विरुद्ध दिशेने पळू लागलेल्या सर्व युद्धनौकातील नाविक व सैनिक आपल्या नेत्याच्या दिशेने प्रवाहात आपल्या नौका वल्हवू लागले. त्यांनी इतका भीषण हल्ला केला की मोगल सैन्य त्याचा सामनाच करू शकले नाही. शत्रुसैनिकांनी निसटण्याचा प्रयत्न केला पण सर्व नौका एकमेकीत गुंतून इतक्या जवळ आल्या की विशाल ब्रह्मपुत्र नदीवर नावांचा जणू पूलच बांधला असल्याचा भास होत होता ! त्या पुलावरून कोणालाही नदीच्या पैलतीरावर जाणे शक्य होते. आपापली ठाणी सोडून मोगल सैनिक पळू लागले, आणि असमी सैनिकांनी त्यांचा पाठलाग सुरू केला. पुढे रामसिंहाच्या नेतृत्वात मोगल व मागे अहोम सैनिक असे थरारक चित्र दिसत होते. त्याकाळी अहोम साम्राज्याच्या सीमेवरील मानस नदीच्या पैलतीरापर्यंत हा पाठलाग सुरू होता; तो थांबला मातृभूमीतून परकीयांना पळवून लावूनच!! अश्या पद्धतीने अहोम साम्राज्याने आपले अजिंक्यत्व टिकवून ठेवले व मोघलांना शरमेने पळता भुई थोडी झाली.

  Image source: wikimedia commons

             पराभूत रामसिंह हताश होऊनच दिल्लीस परतला. त्याचे विजयाचे स्वप्न भंग पावले होते. त्याला वाटले, प्रत्यक्ष ईश्वराचीच ज्यावर कृपा आहे, अशा या भूमीस जिंकण्याची नुसती कल्पनाही मूर्खपणाची आहे. येथील प्रत्येक सैनिक तलवारीचे युद्ध करण्यात अत्यंत निष्णात, निपुण धनुर्धारी, उत्कृष्ट पोहणारा, कुशल नावाडी, आणि असामान्य मेहनती आहे. त्याचप्रमाणे तो उत्कट देशभक्त, महान त्यागी, अतिशय शूर आणि देशासाठी जीवन समर्पण करणारा आहे. अशा या भूमीवर आक्रमण करणाऱ्यांचे व वक्र दृष्टी ठेवणाऱ्यांचे हेतू नेहमीच असफल झाले व होतीलही यात काहीच आश्चर्य नाही!! शत्रूचा पुर्णतः निःपात केल्यानंतरही विजयाचा तो आनंद फार काळ टिकू शकला नाही. सराईघाटात झालेल्या त्या घनघोर युद्धानंतर एक वर्षाच्या आतच वीर सेनापती लाचीत यांचे दुःखद निधन झाले. त्यांच्या मृत्यूने केवळ अहोम नव्हे तर संपूर्ण भारतवर्षाची कधीही न भरून निघणारी हानी झाली.
                मध्ययुगीन भारतात तीन थोर व्यक्तींनी मुघलांविरुद्ध दिलेल्या लढ्याचे इतिहास गोडवे गातो. १६व्या शतकात 'महाराणा प्रताप', १७ व्या शतकात 'छत्रपती शिवाजी महाराज' या बरोबरच 'लाचीत' यांचेदेखील नाव गौरवाने घेण्यात येते. लाचीत यांच्या कधीही न विसरता येण्यासारख्या बलिदानाचा गौरव म्हणून प्रतिवर्षी २४ नोव्हेंबर हा 'लाचीत दिवस'  म्हणून असम मध्ये साजरा केला जातो. आजच्या युवा पिढी मध्ये लाचीत यांच्या कार्याबद्दल जागृती व्हावी हा उद्देश.
        १६७२ मध्ये स्वर्गदेव (महाराज) उदयादित्य सिंहा यांनी लाचीत यांच्या समाधीच्या जागी बांधलेले 'लाचीत मैदाम' आसाममधील जोरहाट जिल्ह्यात असून लाचीत यांचे स्मारक म्हणून प्रसिद्ध आहे.
लाचीत मैदाम, जोरहाट,असम
Image source: wikimedia commons
 
    १९९९ पासून 'राष्ट्रीय रक्षा अकॅडमी' किंवा NDA तर्फे सर्वोत्कृष्ट कॅडेट ला 'लाचीत बोरफुकन पुरस्कार' व गोल्ड मेडल देऊन गौरविले जाते. लाचीत यांचे शौर्य जगताला कळावे यासाठी राष्ट्रीय पातळीवर केला गेलेला हा पहिलाच प्रयत्न होता.
           'ताई-अहोम युवा परिषद' या असामी विद्यार्थी संघटनेतर्फे प्रतिवार्षिक 'महावीर लाचीत पुरस्कार' ज्याचे स्वरूप ५०००० रुपये, प्रशस्तीपत्र आणि पारंपरिक तलवार वितरित केला जातो.
            २०१६ मध्ये गुवाहाटी येथे असम सरकार तर्फे ब्रह्मपुत्र नदीत ३५ फूट उंच लाचीत यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. ज्यात लाचीत यांचा कांस्याचा पुतळा, १८ फुटांचे ८ सैनिकांचे पुतळे व ३२ फूट लांबीच्या २ तोफांचा समावेश आहे.
               ब्रह्मपुत्र नदीतील पुतळा, गुवाहाटी, असम
   Image source: wikimedia commons
     
      सदरील लेखाचा उद्देश हा वीर लाचीत बोरफुकन यांचे कार्य जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावे व समस्त देशास तसेच समाजास त्यांच्या अतुलनिय अशा बलिदानाचे स्मरण व्हावे हाच असून महावीर लाचीत यांस श्रद्धांजली वाहण्याचा team The Lost Heroes चा एक छोटासा प्रयत्न.

महावीर लाचीत अमर रहे
||भारत माता की जय||

माहिती संकलन व लेखन टीम द लॉस्ट हिरोस द्वारे...

संदर्भ- वरील लेखातील सर्व माहितीचे संदर्भ हे संदर्भ
GOI - central archaeological department. विषय :- लाचित बडफुकान, लचित बडफुकान - मधुकर लिमये, Brahmaputra - Aneesh Gokhale, अहोम साम्राज्य - The history of assam, drishti IAS, विविध you tube videos इ. ठिकाणाहून घेतलेली आहे व माहितीची सत्यता पडताळणी केलेली असून माहिती खात्रीशीर आहे.  कोणतीही अडचण वा तक्रार नोंदवण्यासाठी thelostheros21@gmail.com वर संपर्क करावा.
आपले अभिप्राय देखील जरूर कळवावे.
     
    या माहितीचा आमच्याकडे कुठलाही copyright नसून या थोर व्यक्तींची माहिती सर्व समाजापर्यंत पोहोचावी एवढाच आमचा उद्देश आहे; तरी माहिती पुढे पाठवताना फक्त द लॉस्ट हीरोस या नावासहित पाठवावे ही नम्र विनंती.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

योगीराज श्री कल्याण स्वामी

योगीराज श्री कल्याण स्वामी