योगीराज श्री कल्याण स्वामी

                                     पूर्वार्ध
        प्रस्तुत लेखात आपण १७ व्या शतकात जन्मलेल्या एक थोर संताची म्हणजेच 'योगीराज श्री कल्याण स्वामींची' माहिती पाहणार आहोत. कल्याण स्वामींनी परकीय आक्रांतांच्या काळात, अतीव संघर्षमय परिस्थितीत बलोपासना, कीर्तने, धर्मजागरण, समाज प्रबोधन व संघटन करून शिव छत्रपतींच्या हिंदवी स्वराज्यासाठी सुदृढ, सजग व सशक्त समाज निर्माणाचे प्रभावी कार्य केले. 'समर्थांचे बहिश्चर प्राण' असलेल्या कल्याण स्वामींच्या काळाच्या पडद्याआड लपून राहिलेल्या कार्याला पुनः उजाळी देण्याचा प्रयत्न....

कल्याण नामा ग्रंथ विस्तारी, उत्कट कीर्ती विश्वाभीतरी
देहांत साधने गुरु आज्ञेकरी, कल्याण चराचरी पावला नाम।।
        नाशिक जवळील भोगुर (भगूर नाही) गावचे कुलकर्णी कृष्णाजीपंत यांचा विवाह झाला व त्यांना अपत्य प्राप्ती झाली. परंतु दुर्दैवाने त्यांची पत्नी व ते अपत्य थोड्याच कालावधी मध्ये मृत्यू पावले. ऐन तारुण्यात झालेल्या या आघातामुळे कृष्णाजीपंत गावातील सर्व निरवनिरवी करुन तीर्थाटनासाठी बाहेर पडले. अनेक तीर्थक्षेत्रांना भेटी देत ते श्री महालक्ष्मीच्या दर्शनासाठी कोल्हापूरला आले. कोल्हापूर मध्ये बरवाजीपंत कुलकर्णी नावचे एक गृहस्थ होते, त्यांच्या बहिणीचा विवाह व्हावयचा होता; ते त्या चिंतेमध्ये होते. पूर्वसंचितानुसार कृष्णजीपंत आणि बरवाजीपंत यांची भेट झाली. बरवाजीपंतांची विनंती मान्य करुन कृष्णाजीपंतांनी त्यांच्या बहिणीशी-रखुमाबाईंशी विवाह करण्यास मान्यता दिली. तसेच काही काळानंतर पुन्हा तीर्थयात्रा करण्याचा मनोदयही सांगितला. यानुसार बरवाजीपंतची भगिनी रखुमाबाई आणि कृष्णजीपंत यांचा विवाह झाला. श्री महालक्ष्मीच्या कृपेने झालेल्या या विवाहसोह्ळ्यात पुढील दैवी इतिहासाची बीजे होती... 
        कोल्हापूरच्या अंबाबाईच्या कृपेने या दाम्पत्याला पहिला पुत्र  इ.स. १६३६ (शके १५५८) साली झाला व त्याचे नाव 'अंबाजी' असे ठेवण्यात आले. नंतर द्वितीय पुत्राचे नाव 'दत्तात्रेय' असे ठेवण्यात आले. पुत्रांच्या बालपणीच ठरल्याप्रमाणे कृष्णाजीपंत पुन्हा तीर्थाटनासाठी बाहेर पडले व काशीस जाऊन त्यांनी संन्यास घेतला, त्यामुळे अंबाजी तसेच दत्तात्रेय यांचे शिक्षण मामाच्या देखरेखीखाली त्यांच्या आजोळीच पूर्ण होऊ लागले...
           साधारणतः इ.स. १६४५च्या सुमारास आपले १२वर्षांचे संपूर्ण भारत भ्रमण करून पुढील धर्मस्थापणेच्या कार्यासाठी  'समर्थ रामदास' स्वामी पुनः महाराष्ट्रात आले. समाजाला धर्ममार्गाला लावण्यासाठी त्यांची ठिकठिकाणी किर्तने होत असत. समर्थांच्या प्रभावी वाणीने मंत्रमुग्ध होणार नाही तो मनुष्यच कसला..?  समर्थांच्या ओजस्वी आणि रसाळ किर्तनांनी प्रभावित होऊन बरवाजीपंतानी सुद्धा समर्थांजवळ त्यांचे शिष्यत्व ग्रहण करण्याची इच्छा व्यक्त केली व समर्थांनीही त्यांची पारख करुन अनुग्रह देण्याचे मान्य केले. ठरलेल्या दिवशी समर्थ अनुग्रह देण्यासाठी बरवाजीपंतांच्या घरी आले व त्यांना अनुग्रह दिला. बरवाजीपंतानी परंपरेनुसार गुरुदक्षिणा देउ केली असता सोने आणि माती यांना समदृष्टीने पाहणार्या ब्रह्मनिष्ट अश्या समर्थांनी ती नाकारली आणि “द्यायचेच असेल तर श्रीरामकार्यासाठी अंबाजी दे”, असे म्हणाले. हे ऐकून बरवाजीपंत म्हणाले "हा माझ्या बहिणीचा मुलगा असून तिला न विचारता मी कसा देऊ?" यावर "महाराज फक्त अंबाजीच का? दत्तात्रेय व माझ्यासोबत आम्हा तिघांनाही धर्मकार्यासाठी आपल्या सोबत घेऊन चला!" असे उद्गार त्या माऊलीच्या मुखातून बाहेर पडले. या वाक्यावर समर्थ प्रसन्न झाले व त्यांनी तिघांनाही सोबत घेण्याचे ठरवले, माता व दोन्ही पुत्र समर्थांसोबत चालू लागले... वाटेत शिरगाव येथे समर्थांनी मठाची स्थापना केली, दत्तात्रेय स्वामीं व त्यांच्या मातोश्री तेथेच राहिले. अंबाजी मात्र पुढे आजन्म समर्थसेवेत राहिले.

चित्र- समर्थ बरवाजीपंतांना अनुग्रह देताना 

     त्यावेळी समर्थांनी महाराष्ट्रात ठिकठिकाणी रामजन्मोत्सव सुरू केले होते. असाच एक सोहळा साताऱ्या जवळील मसूर (तालुका कऱ्हाड) या गावी होणार होता, त्यावर्षी तेथे एक रथयात्रा आयोजित केलेली होती. सर्वत्र प्रसन्न व उत्साही वातावरणात रथ यात्रेस सुरुवात झाली, समर्थांसोबत त्यांचे शिष्यगण व अंबाजी देखील होते. इतक्यात, रथाच्या मार्गात एक मोठी फांदी आडवी आली; रथ पुढे जाण्यासाठी ती फांदी तोडणे गरजेचे होते परंतु त्या फांदीखाली एक खोल विहीर होती. साहजिकच जो कोणी फांदी तोडेल तो त्या विहिरीत पडणार, सर्व विचारांत असताना अंबाजी पुढे आले व क्षणाचाही विलंब न करता त्या झाडावर चढून फांदी तोडू लागले व फांदीसहित त्या विहिरीत कोसळले. रस्ता मोकळा झाला व राम नामाच्या जयघोषात रथ पुढे मार्गक्रमण करू लागला व उत्सव संपन्न झाला. काही काळाने सर्वांना अंबाजीचे स्मरण झाले ते अजूनही विहिरीतून बाहेर आलेले नव्हते, सर्वांना वाटले की त्यांचे काही बरे-वाईट झाले की काय? सर्वांनी समर्थांना प्रार्थना केली व त्यांसहित सर्व त्या विहिरीजवळ आले व आत डोकावून समर्थांनी विचारले, "अंबाजी, सर्व कल्याण आहे ना...?"(ठीक आहे ना) आतून आवाज आला "स्वामी आपल्या कृपेने सर्व काही कल्याण आहे" व गुरूंच्या आज्ञेने ते वर आले ते 'कल्याण' होऊनच...  त्या घटनेपासून सर्वजण यांना 'कल्याण स्वामी' या नावानेच ओळखू लागले व अशारीतीने 'अंबाजीचे कल्याण झाले'!
     धर्मकार्यासाठी स्वतःच्या प्राणाचीही पर्वा न करणारे कल्याण स्वामी सर्व शिष्यांचे आदर्श बनले.
  चित्र- अंबाजी विहिरीवरील फांदी तोडत असताना

    रामदास स्वामी यांनी दिलेला बलोपासनेचा मंत्र कल्याण स्वामींनी आपल्या जीवनात योग्य रित्या उतरवलेला होता. ते रोज १२०० सूर्यनमस्कार, दंड बैठक व इतर व्यायाम करायचे; ते पतंजलीच्या योग साधनेमध्ये देखील अधिकार प्राप्त झालेले महान योगी होते. त्यामुळे त्यांची शरीरयष्टी अत्यंत पिळदार व बलदंड होती म्हणून ते नदीच्या पुरामध्ये तसेच सज्जनगडावरून खाली उडी घेणे ही असहज कामे लीलया करत असत. समर्थांना सज्जनगडावरील तळ्यातले पाणी आरोग्यास मानवत नसे त्यामुळे कल्याण स्वामी रोज गड उतरून खालील उरमोडी नदीतून दोन प्रचंड हंड्यातून पाणी आणत... एवढी शारीरिक मेहनत करणाऱ्या कल्याण स्वामींना समर्थांनी त्यांना साजेसा असा अर्धा शेर तूप, दोन शेर डाळ व एक शेर गूळ हा आहार करण्यास सांगितले; हा त्यांचा दिनक्रम पाहून अनेक पढीक व शब्दज्ञानी शिष्य त्यांना असूयेने 'दाळगप्पू' असे म्हणत असत. रोज पाणी वाहणे, लेखन करणे अशी क्षुल्लक कामे करणारा कल्याण आपण रोज अध्ययन, पारायण सर्व करत असूनही समर्थांचा प्रिय कसा? अशी असूया इतर शिष्यांच्या मनात निर्माण होत असे...
       कल्याण स्वामी हे गुरूंच्या आज्ञेस किती वंद्य मानायचे हे पुढील प्रसंगावरून दिसून येते, एकदा, सज्जनगडावर गडाच्या टोकाशी रामदास स्वामी उभे राहिले असताना, त्यांची छाटी(वस्त्र) वाऱ्याने उडाली; तेव्हा समर्थांनी उच्चारले "कल्याणा, छाटी उडाली!"  हे ऐकताच गुरुभक्त कल्याण स्वामींनी कसलाही विचार न करता कड्यावरून खाली उडी घेतली व ती छाटी हवेतच झेलली. अशा कित्येक प्रसंगावरून कल्याण स्वामींची स्वामी भक्ती/प्रेम आपल्या निदर्शनास येते.

धन्य धन्य हे गुरू शिष्यपण। धन्य धन्य सेवाविधान।।
धन्य धन्य अभेद लक्षण। धन्य धन्य लीळा अगाध ।।
   
     समर्थांसोबत धर्मकार्यासाठी कल्याण स्वामी देखील प्रवास करायचे. इ.स. १६४९ साली समर्थ शिवथरघळ जि. रायगड येथे वास्तव्यास आले व सुमारे १६६० पर्यंत ते तिथे वास्तव्यास होते. या घळीतच 'दासबोध' या महाकाव्याची निर्मिती झाली असून, ज्याप्रमाणे महर्षी वेेद व्यास यांच्या सांगण्यावरून श्रीगणेशाने महाभारत हे महाकाव्य लिहिले त्याचप्रमाणे समर्थांच्या सांगण्यावरून कल्याण स्वामींनी दासबोध हे महाकाव्य लिहिले. इ.स.१६५४ साली पूर्ण झालेल्या दासबोधाची कल्याण स्वामींच्या हस्ताक्षरातील प्रत आजही उपलब्ध आहे.  
चित्र- शिवथरघळ येथील गुहेतील मूर्ती. (समर्थ डावीकडे व कल्याण स्वामी समोर दासबोध लिहिताना

चित्र- श्री कल्याण स्वामींच्या हस्ताक्षरातील दासबोध (डोमगाव)

     १६६० नंतर पुनः समर्थांचे वास्तव्य सज्जनगडावर होते. एकदा समर्थ सर्व शिष्यांसोबत चर्चा चालू असताना ,समर्थांनी वेदांत विषयाची सुरुवात केली. कोणाला आपल्या पांडित्याचा तर कोणाला आपण केलेल्या दासबोध पारायणांचा आभिमान होता. परंतु या विषयावर चर्चा करताना मी मी म्हणणारे अनेक शब्दज्ञानी त्या प्रत्ययाच्या ब्रह्मज्ञानाने शांत झाले. मग समर्थांनी कल्याणास बोलावले. एका श्लोकाच्या पहिल्या दोन चरणांचा उल्लेख केला; त्याचे पुढचे दोन चरण कल्याणस्वामींनी पूर्ण केले. गुरू-शिष्यांचा असा संवाद बराच वेळ चालू होता, समर्थ श्लोकाचा पूर्वार्ध सांगत तर कल्याण स्वामी पुढचा उत्तरार्ध पूर्ण करत. असे अनेक श्लोक झाले. हीच ती 'दासगीता' होय. या प्रसंगी कल्याणस्वामींची विद्वत्ता पाहून सर्वजण अवाक् झाले. अशाच प्रकारचा एक प्रसंग दासबोधा संदर्भात झाल्याचा उल्लेख आहे. काही शिष्य दासबोधाच्या पारायणांची चर्चा करीत होते. त्यामध्ये “कल्याणाची पारायणे होत नाहीत नुसताच पाणी वाहतो”, असे बोलणे झाले; तेंव्हा समर्थांनी सर्वांना काही प्रश्न विचारले, पाठांतर विचारले, त्यावेळी सर्वजण शांत झाले परंतु त्यावेळी पाणी वाहणाऱ्या कल्याणस्वामींनी तो श्लोक पूर्ण केला.
तो श्लोक पुढीलप्रमाणे,
ऐसा सदगुरु पूर्णपणी। फिटे भेदाची कडसणी।
देहेवीण लोटांगणी । तया प्रभूसी।।
     कल्याण स्वामींचे व्यक्तित्व एकंदरीत शारीरिक दृष्ट्या अत्यंत सुदृढ होते, त्यांच्या दाढी व जटा वाढलेल्या असून त्या रुद्राक्षांनी बांधलेल्या असत, अंगाला भस्म , कानांत कुंडले, बोटांमध्ये मुद्रिका, दंडावर तांब्याचा मारोती, यज्ञोपवीत धारण केलेले असे. कल्याण स्वामी हुर्मुजी (भगव्या) रंगाची वस्त्रे परिधान करीत असत, खांद्यावर पोत्याएवढी झोळी त्यात पुस्तके व लेखन साहित्य असे एकंदरीत 'योगीराज' या उपाधीने गौरविण्यात येणारे कल्याण स्वामी फक्त शरीरीकच नव्हे तर बौद्धिक क्षमतेनेही उत्तम असे होते. त्यांचा स्वभाव अतिशय शांत व मुखी सतत रामनामाचा जप चालू असत. कल्याण स्वामी उत्तम चित्रकारही होते त्यांनी काढलेले श्री वीर हनुमानाचे चित्र उपलब्ध आहे. याचबरोबर कल्याण स्वामी  उत्तम पाठांतर , सुबक हस्ताक्षर , प्रतिभावंत कवी, निष्ठावंत योगी व एकनिष्ठ , स्वामिनिष्ठ शिष्य इ गुणांनी संपन्न असे व्यक्तिमत्व होते.
      समर्थ रामदासांच्या बहुतेक रचनांचे लिखानकार्य हे कल्याण स्वामीच करत असत; तसेच कल्याण स्वामींनी काही स्वतंत्र रचना देखील केल्या आहेत.
'महावाक्य पंचीकरण – अध्यात्म तत्त्वज्ञान विशद करणारे अभंगबद्ध प्रकरण' हे ७०० ओव्यांचे काव्य,
'श्रीरामदास', 'श्री शुकाख्यान', 'संतमाळा', 'सोलीवसुख', 'दासगीता', 'श्री गणेशस्तवन', 'ध्रुव आख्यान', 'समर्थ कल्याण संवाद' व आणखी सहा प्रकरणे रचली आहेत. तसेच 'रुक्मिणीस्वयंवर' हे हिंदी काव्य; याशिवाय, ५ श्लोक, ८ आरत्या,९७ पदे, ३ भूपाळ्या आणि ८२ चौचरणी ओव्या रचल्या आहेत.
     श्री कल्याणस्वामींनी समर्थांवर केलेले हे पद अतिशय सुंदर आहे,
मज तो आवडतो मम स्वामी |
निशिदिनी अंतर्यामी ||धृ||
अक्षैपदाचा सुखदाता |
निरसोनी माया ममता ||१||
भक्तीमार्गाचा गजढाला |
चालविल्या आढाला ||२||
काय बोलो मी किर्तीसी |
न दिसे तुळ्णेसी ||३||
छेत्र बहुतांचे दासाचे |
धाम ची कल्याणाचे ||४||



।श्रीराम जय राम जय जय राम।
।जय जय रघुवीर समर्थ।
।योगीराज प.पू. सदगुरु कल्याण स्वामी महाराज की जय।
।।भारत माता की जय।।


उत्तरार्ध दिनांक १७ मे २०२१ सोमवार रोजी प्रसिद्ध होईल

माहिती संकलन व लेखन टीम द लॉस्ट हिरोस द्वारे...
संदर्भ- वरील लेखातील सर्व माहितीचे संदर्भ हे dasbodh.com , wikipedia.com/kalyanswami , कल्याण स्मरण (कल्याणांची वाङ्मयरचना), kalyanswami.com ,  'पट्टशिष्य योगिराज श्रीकल्याणस्वामी'- सचिन जहागीरदार , समर्थ शिष्य कल्याण- गणेश शंकर देव, इ.यांचे कडून घेतलेली आहे व माहितीची
  सत्यता पडताळणी केलेली असून माहिती खात्रीशीर आहे.  कोणतीही अडचण वा तक्रार नोंदवण्यासाठी thelostheros21@gmail.com वर संपर्क करावा.
आपले अभिप्राय देखील जरूर कळवावे.
     
    या माहितीचा आमच्याकडे कुठलाही copyright नसून या थोर व्यक्तींची माहिती सर्व समाजापर्यंत पोहोचावी एवढाच आमचा उद्देश आहे; तरी माहिती पुढे पाठवताना फक्त द लॉस्ट हीरोस या नावासहित पाठवावे ही नम्र विनंती.

टिप्पण्या

  1. खुप छान उपक्रम राबविण्यात येत आहे.

    उत्तर द्याहटवा
  2. खुप स्तुत्य उपक्रम
    खुप खुप शुभेच्छा....

    उत्तर द्याहटवा
  3. एका थोर व सिद्ध व्यक्तिमत्त्वाचे सुंदर वर्णन. धन्यवाद.

    उत्तर द्याहटवा
  4. खूपच छान मांडणी आणि लेखन 💯💯

    उत्तर द्याहटवा
  5. लेख छान आहे,पुढील लेखासाठी खूप शुभेच्छा!!

    उत्तर द्याहटवा
  6. खुपच छान माहिती लिहीली आहे💯💯💯😄

    उत्तर द्याहटवा
  7. वा उत्तम पुढाकार....👌👌🔥🔥🚩

    उत्तर द्याहटवा
  8. खूप छान लेख आहे.पूर्ण वाचायला द्या.

    उत्तर द्याहटवा
  9. ही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.

    उत्तर द्याहटवा
  10. खुप सुंदर लिखाण आणि या निमित्ताने मुले परत एकदा connect होतील परस्परांशी

    उत्तर द्याहटवा
  11. योगिराज श्रीकल्याणस्वामी महाराज यांच्या विषयी अधिक माहिती वाचण्यासाठी कृपया खालील ब्लाॅगला भेट द्या

    https://kalyanswami.blogspot.com/?m=1

    'श्रीसमर्थांचे पट्टशिष्य योगिराज श्रीकल्याणस्वामी' या चरित्र पुस्तिकेची पीडीएफ डाऊनलोड करण्यासाठी कृपया खालील लिंकवर क्लिक करा.

    https://drive.google.com/file/d/0B8ho1V0LSxsranN6dGxqU3FIcHc/view?usp=drivesdk

    उत्तर द्याहटवा
  12. अप्रतिम 👌 मनःपूर्वक सदिच्छा !😇

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

योगीराज श्री कल्याण स्वामी

म्लेंच्छ संहारक: লা-চিত, कथा रक्तरंजित योध्याची