म्लेंच्छ संहारक: লা-চিত, कथा रक्तरंजित योध्याची
इ.स. १७वे शतक, भारतवर्षाच्या सुदूर ईशान्य भागात एक युद्ध लढले जात होते; दोन्ही प्रतिद्वंद्वी समोरासमोर आपल्या बलाढ्य अश्या नौदलानिशी उभे होते. एक गट आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी तर दुसरा अहंकार... पण अंततः सत्याने अहंकारावर विजय मिळवून अस्तित्व टिकवलेच! वाचा या लेखात....
Image source: wikimedia commons ईशान्य भारत नैसर्गिक साधनसंपत्ती विपुल प्रमाणात लाभलेला एक अतिशय सुंदर भूभाग. पूर्व हिमालयाच्या कुशीत वसलेला हा भाग सध्या 'सात भगिणी' (7 sisters) या नावाने ओळखला जातो. या भागाने भारतवर्षास प्रत्येक गोष्टीत साथ दिली आहे; परंतु आपण का या भागास डावलतो ? फक्त त्यांच्या चेहऱ्याची ठेवण आपल्या सारखी नाही म्हणून ? का ? आपण त्यांना त्यांच्याच देशात परकियांसरखी वागणूक देतो ? सारे भारतीय माझे बांधव आहेत, ते फक्त म्हणाण्यापुरतेच?
प्रस्तुत लेखात ईशान्य भारतात सतरा व्या शतकात होऊन गेलेल्या एका थोर योध्दयाबद्दल माहिती देत आहोत, ज्यांनी आपल्या मातृभूमीच्या रक्षणार्थ सर्वस्वाचे बलिदान दिले परंतु अश्या योद्ध्याची माहिती आपल्यापर्यंत अतिशय तोडक्या प्रमाणात आली .
"म्लेंच्छ संहारक: লা-চিত"
- कथा रक्तरंजित शौर्याची
२४ नोव्हेंबर १६२२ चा सुमार होता. अहोम साम्राज्याचे बरबरुआ {বৰবৰুৱা} ( सेनाध्यक्ष ) ' तामुली ' ज्यांची मोमोई (मामा) नावाने ओळख होती ; पहाटेच्या अल्हाददायक वातावरणात चराईदेव येथील राजोद्यानात फेरफटका मारत असताना कोण्या एका बाळाच्या आवाजाने थांबले. भल्या पहाटेच्या थंडीत कोण बरे बाळास घेऊन जात असावे? या विचाराने थोडासा शोध घेतल्यावर साधारणतः ४ महिन्यांचे एक बाळ रक्ताने माखलेल्या अवस्थेत त्यांच्या दृष्टीस पडले. तामुली यांस त्यावेळी मूलबाळ नसल्याने ईश्वरीय प्रसाद समजुन त्यांनी त्या बाळाला घरी नेऊन त्याचा सांभाळ करण्याचे ठरवले, त्या बालकाचे नाव 'ला-चित' म्हणजेच असामी-अहोम भाषेत रक्ताने माखलेला असे ठेवण्यात आले. ठेवलेले नावच पुढील आयुष्यात त्याची ओळख होणार याची त्यावेळी त्याच्या त्या धर्मपित्यास काय जाणीव? तोच पुढे रक्तरंजित अजेय योध्दा 'लाचित' बरफुकान अखिल अहोम साम्राज्याचा सरसेनापती होऊन स्वकियांचा अंगरखा पांघरुन येणाऱ्या म्लेंच्छांचा संहार करून, आपल्या मातृभूमीचे संरक्षण करण्यासाठी सर्वस्व त्यागणार होता!
अहोम साम्राज्य हे सध्याचा असम व आसपासचा परिसर येथे पसरलेले एक बलाढ्य साम्राज्य होते. मुळ ब्रम्हदेशामार्गे अग्नेय आशिया/थायलंड येथुन ईशान्य भारतात आलेला एक समाज ज्यांनी चोलुंग सुकपा यांच्या नेतृत्वात १३ व्या शतकात 'उईयाॕ' (जमिनदार) पध्दतीची राजनैतिक व्यवस्था नाहिशी करुन स्वतः चे नवे राज्य प्रस्थापित केले. अहोम साम्राज्याची व्यवस्था ही मुलतः 'वेठ बिगार' वा सक्ती कामगार यावर निर्भर होती. त्यांना 'पाईक' असे म्हणत. १८२६ मध्ये इंग्रजांशी चांडवु या ठिकाणी झालेल्या तहा पर्यंत म्हणजेच तब्बल ६०० वर्षे अहोम साम्राज्याची यशस्वी घोडदौड सुरु होती. जन्माने भारतीय नसले तरी अहोमांनी भारतीय संस्कृती तसेच धर्माचा अंगीकार करुन कल्याणकारी पध्दतीने राज्य केले. अहोम ही एकेकाळी असणारी साम्राज्याची अधिकृत भाषा आज लोप पावली आहे. अहोम संस्कृती मध्ये ताई-थाई-तिबेटी-बर्मी यांचे मिश्रण भारतीय हिंदु संस्कृती मध्ये झाल्याने एक मिश्र हिंदु संस्कृती आढळते. नैसर्गिक परिस्थितीजन्य सामानाचा (लाकूड,बांबु,गवत) वापर करुन पुरजन्य परिस्थितीचा सामना करण्यासाठी थोडीशी उंचावर घरे बांधण्यात येत असत. अन्न पदार्थांमध्ये धान्यासमवेत मांसाहाराचे प्रमाण जास्त होते. ईशान्य भारताचा आपण विचार केला असता तिथे आजही परिस्थितीजन्य अन्न(मांसाहार) याचा जास्त वापर आढळतो.
अहोम लोक साहित्य व कला क्षेत्रात निष्णात होते.अहोम भाषेची ताई-कडाई ही स्वतंत्र लिपी अस्तीत्वात होती जीचे आजच्या थाई लिपीशी साधर्म्य आढळते. इतिहास, साहित्य, समाज, कर्मकांड इ. अनेक विषयात अहोम कालीन लेखन उपलब्ध आहे. अहोम राजांनी कवी व विद्वानांना जमिनी अनुदानात देऊन गौरविले तसेच रंगमंचांना प्रोत्साहित केले. संस्कृतातील महत्त्वपूर्ण रचनांचा त्यांनी अहोम भाषेत अनुवाद करवून घेतला. ' बुरुंजी ' नावाची ऐतिहासिक नाट्य कलाकृती सर्वप्रथम अहोम व नंतर असामी भाषेत अनुवादित केलेली आढळते.
अहोम शासन पद्धती मध्ये स्वर्गदेव (राजा) हा सेनेचे नेतृत्व करायचा . 'पाईक ' ही राज्याची मुख्य सेना असत. सेवारत व गैर सेवारत पद्धतीने पाईकांची वर्गवारी होत असत. गैर सेवारत पाईकांना युद्ध प्रसंगी खेलंदार अर्थात सैन्य आयोजकांतर्फे एकत्र करून 'ताई मिलिशिया' प्रकारात त्यांचे गठण केले जात असत.पायदळ , घोडदळ , तोफखाना , नौदल आणि गुप्तचर हे सैन्याचे मुख्य पाच विभाग पडत. प्रारंभीच्या काळात तलवार , भाले , धनुष्य-बाण व नंतर बंदुकांचा वापर केला जात. अभियान पुढे जाण्याआधी गुप्तहेरां तर्फे इत्यंभूत माहिती काढून सारासार विचाराने रणनीती आखली जात. अहोम सैनिक 'गनिमी कावा' प्रकारात पारंगत होते. शत्रू सैन्याला आपल्या भागात आतपर्यंत येऊ देऊन चहूबाजूंनी हल्ला करू चीत करणे ही सैन्य पद्धती होती. आसाम परिसरात नद्यांचे जाळे मोठ्या प्रमाणात असल्याने अहोम नौदल देखील बलाढ्य स्वरूपाचे होते. छोट्या नावांच्या (होडी) मदतीने पुल बनवण्या सारख्या गोष्टी युद्धप्रसंगी कुशलतेने करण्याचे कौशल्य सेनेत होते. अहोम नागरिकांची देशाप्रती निष्ठा व एकता तसेच श्रीमंत वर्गाची युद्धप्रसंगी वेळोवेळी मदत; कुशल सेनापती, वीर व राजे या सर्वांच्या एकतेमुळेच मुघलांच्या १७ आक्रमणांना परतवून आपले अजिंक्यत्व टिकवून ठेवण्यात अहोम यशस्वी ठरले .
अहोम राजचिन्ह Image source: wikimedia commons
अश्या गौरवशाली व सार्वभौम राज्यात जन्म झालेल्या लाचित यांचे प्रारंभिक शिक्षण तामुली मोमाई यांच्या देखरेखीत चालू झाले. मानवताशास्त्र ( कला ) विषयात उच्चशिक्षणा सोबतच , मूर्तिकला व सैन्य प्रशिक्षण घेऊन लाचित पारंगत बनत जात होते. प्रथमतः राजाचे छत्रधर ( শলাধাৰা বৰুৱা ) जे राजाच्या खाजगी सल्लागारा प्रमाणे होते. तेथून सुरुवात करत घोडदळ प्रमुख (ঘৰ বৰুৱা), सिंहलगड किल्ल्याचे किल्लेदार व महाराज चक्रध्वज सिंहा यांच्या अंगरक्षक दलाचे प्रमुख अशा कित्येक जबाबदाऱ्या सेनाध्यक्ष होण्याआधी लाचीत यांनी उत्तमपणे पार पाडल्या. लाचीत यांचे कोणतेही छायाचित्र उपलब्ध नाही परंतु; "पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे रुंद असलेल्या त्यांच्या तेजस्वी चेहऱ्याकडे पाहण्याची कोणाचीही हिंमत होत नसे" अश्या प्रकारची वर्णने आढळतात.
'यवना: क्षममाययु:' या उक्तीप्रमाणे यवनांचा पूर्णपणे नाश झालाच पाहिजे असाच इतिहास ठरला! बखत्यार खिलजीच्या सतरा स्वाऱ्या तसेच देवळे उध्वस्त करण्यासाठी कुप्रसिद्ध अश्या सरदार काळा पहाड या दोहोंची आक्रमणे परतावून त्यांच्या कबरी देखील असमातच बांधल्या गेल्या. १६३९ मध्ये मोगल सेनापती अल्लायार खान याने अहोम राज्यकर्त्यांच्या आपापसातील युद्धाच्या संधीचा लाभ उठवून असमवर हल्ला चढवला. पश्चिम असमपर्यंत पोहोचलेल्या मोगल सैन्यास मोमोई तामुली या अहोम सेनापतींनी थोपवून ठेवले; मोगलांनी तहाची बोलणी सुरू केली. शहाजहानच्या आजारीपणामुळे खिळखिळी झालेल्या मोगल साम्राज्याच्या संधीचा फायदा घेऊन अहोम राजे जयध्वजसिंहांनी मोगलांना हुसकावून विजयी तोरण बांधले. खुद्द आपल्या वडिलांशी कैद करून गादीवर बसलेल्या औरंगजेबाने आपल्या सेनापती मीर जुमल्यास विशाल सैन्यानिशी असम वर पाठवले. अहोम सैन्यातील अधिकाऱ्यांस लाच देऊन मिरजुमला गोहोटी पर्यंत चालून गेला व अहोम राजधानी गडगाव येथे धडक मारली. नाईलाजास्तव अहोम राजांनी टेकड्यांजवळील चराईदेव येथे आश्रय घेतला. असम ज्याचा अर्थच समान नसलेला होतो, जो निबिड अरण्ये, महाकाय नद्या, विशाल पर्वतरांगा, विस्तीर्ण मैदाने अश्या असमतोल भूमीने बनलेला भूभाग आहे तेथे १६६२ मध्ये अर्ध-विजयी झालेल्या मिरजुमल्याचा निभाव लागणे अशक्य होते. मुसळधार पाऊस, डास व प्रतिकूल हवामानाची सवय नसलेल्या मोगल सेनेत वणव्याप्रमाणे मलेरिया ची साथ पसरली. हैराण होऊन त्याने संधीचे पत्र पाठवले. मुघलांच्या आजवरच्या इतिहासाप्रमाणे ही संधी देखील जाचक अटींनी भरलेली होती. पश्चिम असम मोघलांच्या स्वाधीन करून, नुकसान भरपाई, दरवर्षी लाखो रुपये व साठ हत्ती पाठवणे काय कमी होते की अहोम राजकन्येचा विवाह औरंगजेबाशी लावून तिचे नाव रोशन आरा बेगम असे ठेवण्यात आले. तहाची बोलणी करून मिरजुमला परत निघाला, परंतु दैवाच्या मनात काही औरच होते... दिल्ली गाठण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.
लाचितची बहीण अर्थात तामुली यांची कन्या हीचा अहोम राजाशी विवाह झाला होता. मीरजुमल्याच्या स्वारीवेळी लाचित अन्यत्र युद्धात व्यस्त होते , ते परत आले असता गडगाव सोडून परत जाणाऱ्या मोगलांचा पाठलाग करून भाचीस सोडवून आणण्याचे त्यांचे अटोकाट प्रयत्न असफल ठरले. सर्वांवर दुःखाचा डोंगर कोसळला. लाचित सह संपूर्ण अहोम साम्राज्याचे अंतःकरण सूडाच्या अग्निने पेटून उठले. मुख्यमंत्री अतन बडगोहॉंई यांनी महाराजांना विवेकाने आधी सैन्याची जुळवाजुळव करून सामना करण्याच्या दिलेल्या सल्ल्यानिशी अहोम सेनेची तयारी सुरू झाली. शेजारील खाशी , जयंतिया , काच्छारी राजांना विनंती पत्रे पाठवून मोघलांना आपल्या मातृभूमीतून हुसकावून लावण्यासाठी मदत मागवली व त्यांनीही ती पुरवली. परंतु नियतीपुढे कोणाचे चालते? अतिश्रमाने महाराज जयध्वजसिंहांचा मृत्यू झाला. अखेरच्या काळात पुत्र चक्रध्वज सिंहाकडून 'मातृभूमीच्या प्रतिष्ठेचा अपमान धुवून काढण्याचे' वचन घेऊन त्यांनी प्राण त्यागला...
अहोम साम्राज्य Image source: wikimedia commons
युद्धाची तयारी पूर्ण होत असता राजदरबारात एक दूत आला. त्याच्यासोबत पाठविलेल्या काही उंची वस्त्रे - ' मोघल बादशहाच्या अधीन झाल्याचे प्रतीक म्हणून अवश्य परिधान करावी ' या संदेशात औरंगजेबाची धूर्त मनीषा उघड दिसतच होती. संदेश ऐकताच संतापाने लाल झालेल्या राजा चक्रध्वज सिंहांनी ''इंद्राचा वंशज असलेल्या मला तुझ्या म्लेंच्छ राजाचा अंकित व्हा म्हणण्याचे धाडस केल्याबद्दल तू केवळ दूत आहेस यामुळे तुझी गय केल्या जात असून, जा परत जाऊन तुझ्या राजास आम्ही युद्धाचे आव्हान देत असून रणभूमीवर आपला पराक्रम दाखव असे सांग,'' असा संदेश देऊन पाठवले. अशा पध्दतीने युद्धाची ठिणगी पडली...
||भारत माता की जय||
माहिती संकलन व लेखन टीम द लॉस्ट हिरोस द्वारे...
संदर्भ- वरील लेखातील सर्व माहितीचे संदर्भ हे संदर्भ
GOI - central archaeological department. विषय :- लाचित बडफुकान, लचित बडफुकान - मधुकर लिमये, Brahmaputra - Aneesh Gokhale, अहोम साम्राज्य - The history of assam, drishti IAS, विविध you tube videos इ. ठिकाणाहून घेतलेली आहे व माहितीची सत्यता पडताळणी केलेली असून माहिती खात्रीशीर आहे. कोणतीही अडचण वा तक्रार नोंदवण्यासाठी thelostheros21@gmail.com वर संपर्क करावा.
आपले अभिप्राय देखील जरूर कळवावे.
या माहितीचा आमच्याकडे कुठलाही copyright नसून या थोर व्यक्तींची माहिती सर्व समाजापर्यंत पोहोचावी एवढाच आमचा उद्देश आहे; तरी माहिती पुढे पाठवताना फक्त द लॉस्ट हीरोस या नावासहित पाठवावे ही नम्र विनंती.
मस्त 👍🙌🙌
उत्तर द्याहटवाखुपच छान
उत्तर द्याहटवा👌👌🙌🙌
उत्तर द्याहटवा