योगीराज श्री कल्याण स्वामी
उत्तरार्ध
वाटे इतराला समाधिस्थ |
परी प्रत्यक्ष असती नांदत ||
पाहता भक्तांनी शुद्धभावार्थे |
प्रगटोन करिती सांभाळ ||
इ.स. १६७८ च्या सुमारास महाराष्ट्रच नव्हे तर सबंध भारतवर्षावर परकीय (म्लेंच्छ) आक्रमणे बहू प्रमाणात होती. श्री शिवछत्रपतींनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याची घोडदौड देखील सुरू होतीच परंतु, मराठवाडा हा चहूबाजूंनी परकीय आक्रांतांच्या अत्याचारास बळी पडत होता; अश्या परिस्थितीत स्वराज्यासाठी सशक्त व सुदृढ समाज निर्माण करणे गरजेचे होते. ही बाब जाणून समर्थ रामदास स्वामींच्या आज्ञेवरून समर्थ शिष्य कल्याण सज्जनगड सोडून धाराशिव (आजचे उस्मानाबाद) भागातील सीना नदीतीरावरील डोमगाव या ठिकाणी आपल्या पुढील कार्यासाठी स्थायिक झाले. डोमगाव कडे जाण्यापूर्वी वाटेत शिरगाव येथे बंधू दत्तात्रेय स्वामींची भेट घेऊन, पंढरपूर, तुळजापूर इ. देवस्थानांचे दर्शन घेऊन ते सोबतीस १४ शिष्यांसोबत पुढील वाटेस लागले. योगिराज श्री कल्याण स्वामी डोमगाव परिसरामध्ये आल्यानंतर वर्षातील प्रत्येकी चार महिने डोमगाव, परंडा आणि डोंजा या तीन गावांमध्ये वास्तव्यास असत. डोंजा येथील श्री रेणुकादेवीचे मंदिर हे श्रीकल्याणस्वामींचे वास्तव्यस्थान होते. आजही या मंदिरात 'कल्याणस्वामींची शिळा' या नावाने एक शिळा आहे. या शिळेवर श्रीकल्याणस्वामी आसनस्थ होत असत.
सीना नदीच्या तीरावर मठ स्थापन करून प्रभू श्रीरामचंद्र व मारोतीरायची उपासना होऊन लोकांत स्वराज्याविषयी जागृती तसेच धर्मस्थापणेचे काम करण्याचे त्यांनी ठरविले. परंतु दरम्यानच्या काळात एकाएकी एक अघटित प्रसंग ओढवला. माघ वद्य नवमी शके १६०३ (इ.स.१६८१)रोजी समर्थ रामदास स्वामी यांनी सज्जनगड येथे अवतार समाप्ती केली. आपल्या सद्गुरूंनी नश्वर देहाचा त्याग केला. त्यांचे दर्शन अपल्याला लाभले नाही, हे कळताच कल्याण स्वामींना दुःख अनावर झाले; समर्थ दर्शनाच्या ओढीने ते सज्जनगडावर आले, श्री समर्थांच्या समाधीला अश्रूंचा अभिषेक घातला, आपला शिष्योत्तम कल्याण आपल्या दर्शनासाठी आला आहे हे पाहून समर्थांनी कल्याण स्वामींना सगुण रूपात दर्शन दिले. समाधी दुभंगली, समर्थांचे ज्योतीर्मय सगुण दर्शन घेऊन कल्याण स्वामी सज्जनगडावरून खाली आले. त्यांना समर्थांनी सांगीतले की, "मी देह रूपाने जरी नसलो तरी दासबोध, आत्माराम हे ग्रंथ माझीच रूपे आहेत; त्यामुळे दुःखी होऊ नये, मी निरंतर आहे". समर्थांचा हा गुरुपदेश घेऊन कल्याण स्वामी गड उतरले. परंतु त्यानंतर मात्र ते परत कधीही सज्जनगडावर गेले नाहीत. सज्जनगडावर सर्वत्र समर्थांच्या वास्तव्याच्या खुणा होत्या त्यामुळे, त्यांना सर्व सज्जनगडच समर्थांचे रूप वाटू लागला. प्रतिवर्षी ते सज्जनगडच्या पायथ्याशी जात व तेथूनच श्री समर्थांना नमस्कार करत असत. धन्य ही गुरूभक्ती. आत्माराम स्वामी म्हणतात,
कल्याण स्वामी सत् शिष्य मोठा| सद्गुरूपायी जडलीसी निष्टा || हृदयी झालासे ॐ परमार्थ साठा| सदा संतुष्टांमाजी वसतु||
इ.स.१६७८ ते १७१४ या काळात कल्याण स्वामींनी मराठवाडा, आंध्रप्रदेश व कर्नाटक सीमेलगतच्या भागात २५० पेक्षा जास्त मठाची स्थापना केली. कठीण काळात संघर्ष करून ते बलोपासना, कीर्तने, भक्ती व सन्मार्ग या पद्धतीने शारीरिक व बौद्धिक दृष्ट्या सशक्त व सुदृढ समाज निर्मिण्याचे कार्य निरंतर करत होते. जागोजागी कीर्तने, ग्रंथराज दासबोधाची पारायणे करून त्यांनी सामान्य जनतेला उपासना मार्गाला लावले; कुठलेही कार्य ज्यामुळे नाव खराब होईल असे न करण्याचा त्यांचा कटाक्ष असे. डोमगाव परिसरातील स्वामींच्या जवळपास ४४ शिष्यांची यादी उपलब्ध आहे. डोमगाव येथील सीना नदी जी त्यांना त्यांचे श्रम हरणारी वाटू लागली म्हणून सीनेचे श्रमहरणी असे नामांतर करून स्वामींनी तीची महती सांगणारी आरती देखील लिहिली आहे. कल्याण स्वामींनी केलेल्या समर्थ कार्याच्या खुणा आजही सर्वत्र आढळतात.
जवळपास सन १७१४ हे वर्ष असावे. कल्याण स्वामी परांड्यास होते. त्यावर्षी आषाढ मास हा अधिक मास होता. परांडा येथे मठामध्ये कल्याण स्वामी महाकाव्य रामायण सांगत होते. हे रामायण ऐकण्यासाठी परिसरातील अनेक साधुसंत आले होते. ती परमपवित्र रामकथा ऐकून सर्वजण तृप्त झाले. श्री समर्थांच्या निधनानंतर त्यांच्या अस्थी चाफळ येथे वृंदावनात ठेवल्या होत्या ज्यांची जबाबदारी श्री केशवस्वामी यांच्यावर होती. अस्थी विसर्जनाबाबद दरवेळी कल्याण स्वामींना विचारले असता 'पुढील वेळी पाहू' असे उत्तर मिळायचे. या वेळी केशव स्वामींनी समर्थांच्या अस्थी गंगा विसर्जनासाठी बरोबर घेतल्या व वाटेत कल्याण स्वामींना विचारून पुढे जावे असा त्यांचा विचार. परंतु नियतीच्या मनात काही अघटित घडवण्याचे होते! आणि परांड्यास अघटित घडले! चाफळ वृंदावनातून समर्थांच्या अस्थी बाहेर काढताच कल्याण स्वामी इकडे दर्भासनावर बसले. त्रिबंध करुन प्राणायाम केला व या प्राणायामाद्वारेच त्यांनी आपले प्राण पंचत्वात विलीन केले. आपल्या गुरूंच्या अस्थीविसर्जनाच्या मुहूर्तावरच श्री कल्याण स्वामींनी योगबलाने आपला देह ठेवला. यातून आपल्याला गुरू शिष्याच्या प्रेमाची जाणीव होते. ती तिथी होती आषाढ शु. १३ शके १६३६ इ. स.१७१४. श्री समर्थांच्या निर्वाणानंतर जवळपास ३३ वर्षांनी कल्याणस्वामींनी देह ठेवला, तो ही श्री समर्थांच्या अस्थिविसर्जनाच्या योगानेच!
श्री कल्याण स्वामींचे पार्थिव डोमगाव येथे आणून त्यांचा अंत्यविधी पूर्ण करण्यात आला. वर्तमान स्थितीत डोमगाव येथे असलेले समाधी मंदिर हे कल्याण स्वामींच्या निर्वाणाच्या जवळपास ५९ वर्षांनी बांधले गेले. या मंदिरामध्ये ४ शिलालेख आढळतात . मंदिरामधील लाकडी सभामंडप मठपती श्रीरामबुवा यांनी सन १९१४ ते १९१८ या कालावधीमध्ये बांधला. कल्याणस्वामींची समाधी ही वालुकामय पाषाणाची असून या समाधिमंदिरात, जसा समर्थ रामदासस्वामींनी सांगितला व कल्याणस्वामींनी लिहून घेतला, अशा त्या दासबोधाची हस्तलिखित प्रत, कल्याणस्वामींची जपमाळ इत्यादी स्मृतिवस्तू ठेवल्या आहेत. समर्थ शिष्य कल्याण पुस्तकाचे लेखक व रामदासी कार्याच्या संशोधनासाठी आयुष्य वेचणारे शंकर श्रीकृष्ण देव हे अनेक दिवस डोमगाव मठात येऊन राहिले होते. त्यांनी तेथून मूळ दासबोधाची शुद्ध प्रत लिहून घेतली व त्यावरून दासबोध प्रसिद्ध केला.
श्री क्षेत्र डोमगाव हे स्थान परांडा तालुका जिल्हा धाराशिव(उस्मानाबाद) येथे असून जवळील रेल्वे स्थानक उस्मानाबाद व कुर्डुवाडी आहेत. येथील मठामध्ये श्री कल्याण स्वामींच्या आठवणीतील बऱ्याच गोष्टी संग्रही ठेवण्यात आलेल्या आहेत. 'याचे नियोगे मज बहू विश्रांती ' असे उद्गार कल्याण स्वामीं बद्दल काढले होते. अशा थोर महात्म्याचे कार्य म्हणावे तेवढे सर्वांच्या मुखी आले नाही ही दुर्दैवाची बाब होय! आपण सर्वांनी या महान कार्याचे पुन्हा एकदा स्मरण करून ते आपल्या आचरणात उतरवावे म्हणजे कार्याचा उद्देश सफल होईल. आपल्यासाठी जीवन वेचणाऱ्या पुण्यात्मांचे स्मरण करूया व त्यांचे हे महान कार्य पुढील पिढी पर्यंत पोहोचवूया.
श्री क्षेत्र डोमगाव मठातील काही चित्रे
।। श्री राम समर्थ ।।
कल्याणाचे नाम कल्याणकारी। कल्याणाचे ध्यान सर्वांसि तारी।
कल्याणाचा हस्त माथा जयाचे। चारी मुक्ती वंदिती पाय त्याचे॥१॥
कल्याण होणे जरी तूज आहे। कल्याणपायीं मन स्थीर राहे।
कल्याणवाणी पडता सुकानीं। कल्याण जाले बहुसाल प्राणी॥२॥
अविनाश हें नाम कल्याण ज्याचें। करी सर्व कल्याण सर्वा जिवांचे।
समर्थें जनी ऊतरायासी पारी। अशी ठेविली मूर्ति कल्याणकारी॥३॥
श्रमहरणितटाकीं स्वामी कल्याणराजा। परम दिनदयाळू नांदतो स्वामी माझा।
सदय ह्रदय ज्याचें ध्यान हे आठवीतां। परम सफल येतो मोक्ष कल्याण हाता॥४॥
बहू मत्तमत्तांतरी दाटि जाली। तयाचे पदीँ चित्तवृत्यादि ठेली।
जगज्जीवनाचा प्रभू जो अनामी। नमस्कार साष्टांग कल्याणस्वामी॥५॥
॥ जय जय रघुवीर समर्थ ॥
।श्रीराम जय राम जय जय राम।
।जय जय रघुवीर समर्थ।
।योगीराज प.पू. सदगुरु कल्याण स्वामी महाराज की जय।
।।भारत माता की जय।।
माहिती संकलन व लेखन टीम द लॉस्ट हिरोस द्वारे...
संदर्भ- वरील लेखातील सर्व माहितीचे संदर्भ हे dasbodh.com , wikipedia.com/kalyanswami, समर्थ शिष्य कल्याण- गणेश शंकर देव, इ.यांचे कडून घेतलेली आहे व माहितीची सत्यता पडताळणी केलेली असून माहिती खात्रीशीर आहे. कोणतीही अडचण वा तक्रार नोंदवण्यासाठी thelostheros21@gmail.com वर संपर्क करावा.
आपले अभिप्राय देखील जरूर कळवावे.
या माहितीचा आमच्याकडे कुठलाही copyright नसून या थोर व्यक्तींची माहिती सर्व समाजापर्यंत पोहोचावी एवढाच आमचा उद्देश आहे; तरी माहिती पुढे पाठवताना फक्त द लॉस्ट हीरोस या नावासहित पाठवावे ही नम्र विनंती.
खुप छान माहिती आहे
उत्तर द्याहटवामस्त 👍🏻
उत्तर द्याहटवायोगिराज श्रीकल्याणस्वामी महाराज यांच्या विषयी अधिक माहिती वाचण्यासाठी कृपया खालील ब्लाॅगला भेट द्या
उत्तर द्याहटवाhttps://kalyanswami.blogspot.com/?m=1
'श्रीसमर्थांचे पट्टशिष्य योगिराज श्रीकल्याणस्वामी' या चरित्र पुस्तिकेची पीडीएफ डाऊनलोड करण्यासाठी कृपया खालील लिंकवर क्लिक करा.
https://drive.google.com/file/d/0B8ho1V0LSxsranN6dGxqU3FIcHc/view?usp=drivesdk
Chan 👌👌👌
उत्तर द्याहटवाभाग-2 सुद्धा छान लिखीत आहे.👌👌👌🙏💯💯💯
उत्तर द्याहटवाaatant sundar mahiti milali
उत्तर द्याहटवाSundar mahiti milali
उत्तर द्याहटवाGood going 🙌 keep it up 👍
उत्तर द्याहटवाLooking forward for many more 🤞😇
उत्तर द्याहटवा